
पुणे, 10 जुलै (हिं.स.)। श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजिका, बचत गट, स्थानिक कारागीर आणि लघुउद्योजकांना थेट ग्राहकांशी जोडणारा 'अमृत पेठ - थेट बाजारपेठ' हा श्रावण महोत्सव ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी कोथरूड येथील गांधी भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असेल.
महोत्सवात महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या फॅशन ज्वेलरी, हस्तकला, गृहसजावटीच्या वस्तू, गृहउपयोगी साहित्य, पूजासाहित्य, भेटवस्तू, खाद्यपदार्थ तसेच विविध पारंपरिक उत्पादनांचे शेकडो स्टॉल्स उभारले जाणार आहेत. ग्राहकांना उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी मिळणार असल्याने दर्जेदार वस्तू वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत.
तीन दिवसांच्या महोत्सवात शाडूच्या गणपती मूर्ती बनविण्याची स्पर्धा, मंगलागौरी खेळ स्पर्धा, श्रावण क्वीन स्पर्धा, चिमुकल्यांसाठी रंग भरा स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा स्पर्धा व सन्मान सोहळा, तसेच संगीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे.
'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेला प्रोत्साहन देत महिला उद्योजिका, बचत गट आणि स्थानिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम स्वावलंबी महिलांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.
खरेदी, मनोरंजन, संस्कृती आणि उद्योजकतेचा संगम असलेल्या या श्रावण महोत्सवाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, अमृत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु