
- चाकूर पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलीची सुखरूप सुटका
लातूर, 10 जुलै (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत यशस्वी शोध घेतला असून, तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. दिनांक ४ जुलै २०२६ रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलिसांनी तपासाची विशेष चक्रे फिरवली. पीडित मुलीकडे मोबाईल फोन नसल्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते, परंतु पोलिसांनी मानवी माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे गावोगावी शोधमोहीम राबवली. अखेर ८ जुलै २०२६ रोजी पोलिसांना मुलीचा शोध लागला आणि तिला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चामले करत आहेत. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis