
रायगड, १० जुलै (हिं.स.) : विठ्ठलभक्ती, सायकलिंगची आवड आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत असोसिएशन ऑफ सायकल रायडर्स, अलिबागचे चार सायकलस्वार सलग दुसऱ्या वर्षी अलिबाग ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी सायकल वारी करत आहेत. पंढरपूर सायकल वारी ग्रुपतर्फे एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले व्हर्च्युअल चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या सायकल रिंगणात सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.
या व्हर्च्युअल चॅलेंजमध्ये सलग तीन महिन्यांत किमान ६० दिवस सायकल चालविणे आणि एक हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण करणे आवश्यक होते. असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध आठवले, उपाध्यक्ष रविकिरण आवले, राम जोशी आणि संजीत बागवाले यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली.
रविवार, १२ जुलै रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या सायकल रिंगणासाठी गुरुवार, ९ जुलै रोजी अनिरुद्ध आठवले, रविकिरण आवले, संजीत बागवाले आणि किशोर शिलधनकर यांनी अलिबागहून सायकल प्रवासाला सुरुवात केली. या वारीचा पहिला मुक्काम पुणे, दुसरा फलटण आणि तिसरा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असून, परतीचा प्रवास गोंदवले आणि पुणे मार्गे अलिबाग असा नियोजित करण्यात आला आहे.
पाऊस, वारा आणि लांबच्या प्रवासाची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा गजर करत हे सायकल वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहेत. श्रद्धा, शिस्त, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात अधिकाधिक युवकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध आठवले यांनी व्यक्त केली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)