आरोग्य सुविधांच्या बृहद आराखड्यात अमरावतीतील पीएचसी उन्नतीकरणाचा विचार – आरोग्यमंत्री
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : राज्यातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि उन्नतीकरणासाठी तयार करण्यात येत असलेल्या बृहद आराखड्यात अमरावती जिल्ह्यातील माहुली, जहांगीर, नेर आणि पिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) उन्नतीकरणाच्या मागणीचाही विचार
आरोग्य सुविधांच्या बृहद आराखड्यात अमरावतीतील पीएचसी उन्नतीकरणाचा विचार – आरोग्यमंत्री


मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : राज्यातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि उन्नतीकरणासाठी तयार करण्यात येत असलेल्या बृहद आराखड्यात अमरावती जिल्ह्यातील माहुली, जहांगीर, नेर आणि पिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) उन्नतीकरणाच्या मागणीचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानसभा सदस्य राजेश वानखेडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री बोलत होते. सदस्य हरीश पिंपळे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका तसेच जिल्हा रुग्णालय,उप रूग्णालय निर्मितीचे निकष २००१ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे २०१३ मध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लोकसंख्येत वाढ झाली असून लोकप्रतिनिधींकडूनही नवीन आरोग्य सुविधांची मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थितीनुसार आरोग्य सुविधांचे पुनर्नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक पाच किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असून, त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व्यापक आराखडा तयार करत आहे.

या आराखड्यात लोकसंख्या, भौगोलिक गरजा आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या यांचा समन्वय साधून निर्णय घेतले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री यांनी सांगितले.

राजेश वानखेडे यांनी उपस्थित केलेल्या अमरावती जिल्ह्यातील माहुली, जहांगीर, नेर आणि पिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उन्नतीकरणाच्या मागणीचाही या बृहद आराखड्यात समावेश करून त्यावर सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande