
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)।
सोलापूरातील बी-२ मिळकतधारकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित फोनप्रकरणीही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर महत्त्वाचा खुलासा केला.
आमदार कोठे म्हणाले की, तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बी-२ मिळकतधारकांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून अन्यायकारक महसूल कमी करण्यासाठी आवश्यक पुराव्यांसह अवघ्या सात दिवसांत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. या प्रक्रियेत अधिकारी सदाशिव पडघुणे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही केली.
सध्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंत्रालयातील बैठकीत हा प्रश्न केवळ सोलापूरपुरता मर्यादित असून तत्कालीन परिस्थितीत झालेल्या अन्यायाशी संबंधित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा प्रश्न निकाली निघण्यास मदत झाली असून, यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल आणि रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास कोठे यांनी व्यक्त केला.
खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत बोलताना त्यांनी, प्रणिती शिंदे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय वारसा पुढे नेताना त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचाही आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड