
नाशिक, 10 जुलै (हिं.स.)।
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (एमपीजीआयएमईआर) नाशिक येथील निवासी डॉक्टरांनी निषेध केला. काळी फीत लावून या डॉक्टरांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध करत, संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
या आंदोलनाद्वारे डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे, रुग्णालयांमध्ये सक्षम सुरक्षा व्यवस्था आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, या प्रकरणातील संबंधित नगरसेवकाला तत्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि समाजात योग्य संदेश जाईल, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन राज्यव्यापी 'सेंट्रल मार्ड'च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आयोजित करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मार्ड अध्यक्ष डॉ. रोहिदास खंडारे यांनी केले. सेंट्रल मार्ड प्रतिनिधी डॉ. अमोल देवरे, डॉ. श्रेया चौधरी, डॉ. इर्शाद तसेच इतर निवासी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराविरुद्ध एकजूट दर्शविली. उपस्थित डॉक्टरांनी डॉक्टरांवरील हिंसाचार म्हणजे आरोग्य व्यवस्थेवरील हल्ला आणि सुरक्षित डॉक्टर – सुरक्षित रुग्ण हा संदेश देत शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV