
ठाणे, 10 जुलै (हिं.स.)। ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारत कमकुवत होऊन ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग अचानक कोसळला. हे बांधकाम सुमारे 25 ते 30 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेत जयकुमार जयस्वाल या 10 वर्षीय मुलाचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. जखमींमध्ये उर्मिला जैस्वाल (वय 30 वर्षे) आणि विनीतकुमार जैस्वाल (वय 8 वर्षे) यांचा समावेश आहे.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्कालीन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयकुमार जयस्वाल याला सिव्हील रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, प्रभाग समितीचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या असून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये भिंत कोसळून आठ जणांचा, तर झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे परिसरात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील मद्रास चाळ दुर्घटनेने पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule