
वर्धा,10 जुलै (हिं.स.) | महिला व मुलींविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ५ वर्षांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक पाळत ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात ही विशेष पडताळणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या तब्बल ५७३ गुन्ह्यांमधील ७१६ आरोपींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिस पथकांनी थेट आरोपींच्या निवासस्थानी भेटी दिल्या. यामध्ये आरोपी सध्या कुठे राहतो आणि त्याची उपस्थिती काय आहे, जामिनावर सुटलेले आरोपी सध्या काय कामधंदा किंवा व्यवसाय करतात, आरोपीकडून पीडित महिला किंवा मुलीला कोणताही त्रास दिला जात आहे का, अथवा त्यांच्यासोबत पुन्हा असा गुन्हा घडला आहे का, याची माहिती घेण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींना कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा संशयास्पद कृत्यांमध्ये सामील न होण्याची कडक समज दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नागरिकांमध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी