
लातूर, 10 जुलै (हिं.स.)।
:महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर स्पर्धा परीक्षा ऑनलाईन (CBT) ऐवजी ऑफलाईन (OMR) पद्धतीने घेण्यात याव्यात, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऑफलाईन आयोजित करावी, पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ द्यावी आदी विविध न्याय्य मागण्यांसाठी लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर 'लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समिती'च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
समितीच्या निवेदनानुसार, सध्या MPSC आणि विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षा CBT पद्धतीने घेतल्या जात असून या प्रणालीमुळे ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परीक्षेदरम्यान होणारे तांत्रिक बिघाड, पारदर्शकतेबाबत निर्माण होणारे प्रश्न तसेच नॉर्मलायझेशन (Normalization) पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे समितीने नमूद केले.
निवेदनात MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन OMR पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आगामी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील ऑफलाईन आयोजित करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय, अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ (Age Relaxation) देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व मागण्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने शासनाने त्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला
--------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis