
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींसाठीच्या विविध योजनांमध्ये राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित मागण्यांबाबत संबंधित विभागांसोबत समन्वय साधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये सदस्य बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले, दिव्यांगांच्या विवाह प्रोत्साहन योजनेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पती किंवा पत्नी यांपैकी एक जण दिव्यांग असल्यास दीड लाख रुपये, तर दोघेही दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली असून टूलकिट योजनेअंतर्गत पूर्वी दिल्या जाणाऱ्या एक हजार रुपयांऐवजी आता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने १५ हजार रुपये दिले जात आहेत.
दिव्यांगांना शिक्षण, नोकरी आणि गट-अ पर्यंतच्या पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून, पूर्वी सात प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश असताना आता २१ प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश करण्यात आला आहे. विविध विभागांशी संबंधित प्रलंबित विषयांवर पाठपुरावा सुरू असून दिव्यांगांसाठी 'सिंगल विंडो क्लिअरन्स' व्यवस्था लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.
अनाथांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत १३ हजारांहून अधिक अनाथांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 'राईट टू सर्व्हिस ॲक्ट' अंतर्गत समाविष्ट करण्याचा शासनाचा विचार असून ४० दिवसांच्या कालमर्यादेत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, एक टक्का आरक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत ९१६ पुरुष आणि १२६ महिला अशा एकूण १,०४२ अनाथ युवक-युवतींना शासकीय सेवेत नियुक्ती मिळाल्याची माहितीही मंत्री श्री. सावे यांनी दिली.
दिव्यांग आणि अनाथांच्या उर्वरित मागण्यांबाबत संबंधित विभागांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सचिव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आठ ते दहा दिवसांत बैठक घेऊन पुढील निर्णय करण्यात येतील, अशी ग्वाहीही मंत्री श्री. सावे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर