
अमरावती, 10 जुलै (हिं.स.) | शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वाढता वावर आता गंभीर नागरी समस्येचे रूप धारण करत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गायी, बैल आणि इतर जनावरे दिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि व्यापारी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. भरधाव वाहतुकीच्या मार्गावर जनावरांचे कळप दिसत असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे, तर अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा जीवघेण्या घटना घडूनही महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील यशोदा नगर चौक, नवाथे चौक, दस्तूर नगर चौक, काँग्रेस नगर, चपराशीपुरा, रेल्वे स्थानक परिसर, विद्यापीठ ते डेंटल कॉलेज मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, गाडगे नगर, बियाणी चौक तसेच इतर अनेक प्रमुख मार्गांवर दिवस-रात्र मोकाट जनावरे वावरताना दिसतात. काही ठिकाणी ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात, तर काही ठिकाणी अचानक धावत येऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करतात. परिणामी वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात, त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघात घडतात. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
कामानिमित्त, शाळा, महाविद्यालये किंवा बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना रोजच मोकाट जनावरांचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी जनावरे अचानक धावत सुटल्याने नागरिकांची पळापळ उडते. मोकाट जनावरांमुळे शहरात गेल्या काही वर्षांत अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत.
मनपाची मोहीम कागदावरच ?
महानगरपालिकेकडून अधूनमधून मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिमा राबवल्या जातात. मात्र त्या काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहतात. कारवाई संपताच पुन्हा तीच जनावरे त्याच ठिकाणी दिसू लागतात. त्यामुळे या मोहिमा केवळ औपचारिकता ठरत असल्याची टीका नागरिक करत आहेत. जनावरांच्या मालकांवर प्रभावी दंडात्मक कारवाई होत नसल्याने त्यांना कोणतीही भीती उरलेली नोही. परिणामी शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पावसाळ्यात धोका अधिक वाढला
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. अशा परिस्थितीत अचानक समोर आलेल्या जनावरांमुळे वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली काळ्या रंगाची जनावरे सहज दिसत नसल्याने जीवघेणे अपघात घडण्याचा धोका अधिक वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी