अठरा उदगीरकरांची सायकल वारी; औसाहून सोलापूरकडे प्रयाण
लातूर, 10 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उदगीर येथील १८ सायकलपटूंनी गुरुवारी वारीला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात औसा येथे मुक्काम क
आषाढी वारी निमित्त सायकलवारी


लातूर, 10 जुलै (हिं.स.)।

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उदगीर येथील १८ सायकलपटूंनी गुरुवारी वारीला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात औसा येथे मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी हे सायकलपटू सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास करत सोलापूरकडे रवाना झाले.

वारीदरम्यान सायकलपटू केवळ पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत नसून समाजप्रबोधनाचाही संदेश देत आहेत. पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली, प्लास्टिकमुक्ती, भ्रष्टाचार निर्मूलन, स्त्री शिक्षण व सन्मान, गोरक्षण आणि पेट्रोल बचतीचा संदेश ते नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत.

उदगीर सायकलिंग क्लबचे प्रमुख सतीषकुमार चवळे यांनी सांगितले की, आषाढी एकादशी रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने ९ ते १२ जुलैदरम्यान ही सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. १८ ते ७५ वर्षे वयोगटातील १८ सायकलपटू या वारीत सहभागी झाले असून, एकूण २७० किलोमीटरचा प्रवास ते पूर्ण करणार आहेत.

गुरुवार, दि. ९ जुलै रोजी उदगीर येथील दुनिया हनुमान मंदिरातून वारीला प्रारंभ झाला. पहिला मुक्काम औसा, दुसरा सोलापूर आणि तिसरा मुक्काम पंढरपूर येथे असेल. रविवार, दि. १२ जुलै रोजी राज्यभरातून आलेल्या सायकलपटूंच्या उपस्थितीत भव्य रिंगण सोहळा पार पडणार असून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन या सायकल वारीची सांगता होणार आहे.

यावर्षीच्या पंढरपूर सायकल वारीत सुनिल ममदापूरे, जगदीश पंडित, सुर्यकांत आंबेसंगे, शाम सुगंधी, बालाजी इंद्राळे, विनोदकुमार टवानी, रविराज जाधव, भास्कर कुंडगीर, सतीषकुमार चवळे, कृष्णा कुंभार, गोविंद रंगवाळ, गणेश कांबळे, अतुल वाघमारे, रमाकांत वडजे, ज्ञानेश्वर चंडेगावे, पंडित इंगळे, साईनाथ कोरे आणि मुकेश नेरुणे हे सायकलपटू सहभागी झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande