जळगावात घरफोडी-दुचाकी चोरीच्या १० गुन्ह्यांची उकल; पाच आरोपी जेरबंद
जळगाव, 10 जुलै (हिं.स.) | जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या काही दिवसांत १० गुन्ह्यांची उकल करत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्
जळगावात घरफोडी-दुचाकी चोरीच्या १० गुन्ह्यांची उकल; पाच आरोपी जेरबंद


जळगाव, 10 जुलै (हिं.स.) | जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या काही दिवसांत १० गुन्ह्यांची उकल करत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.

तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुजीत सिंग सुजनसिंग बावरी (२६, तांबापुरा), दीपक बापू पाटील (२५, पंचशील नगर), राजेश माणिक राठोड (२४, तांबापुरा), सुमित संजय कोळी (१९, रामेश्वर कॉलनी) आणि महेश उर्फ संतोष भोई (२४, तांबापुरा) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० गुन्ह्यांमध्ये सहभागाची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये ९ घरफोडी आणि एका दुचाकी चोरीचा समावेश आहे. आरोपींकडून घरफोडीतील सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचे दागिने व इतर साहित्य, तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने जिल्ह्यातील इतर भागांतही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande