घाटंजी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीची चर्चा
यवतमाळ, १० जुलै (हिं.स.) : घाटंजी येथील भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे पुन्हा रंगू लागली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष महेश पवार यांचा काही कार्यक्रमांमधील आणि बॅनर्सवरील उल्लेख टाळला जा
घाटंजी भाजप शहराध्यक्ष नेत्यांकडून ‘साईडलाईन’?


यवतमाळ, १० जुलै (हिं.स.) : घाटंजी येथील भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे पुन्हा रंगू लागली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष महेश पवार यांचा काही कार्यक्रमांमधील आणि बॅनर्सवरील उल्लेख टाळला जात असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्यानंतर तत्कालीन शहराध्यक्ष गजानन ढवळे यांनी भाजपचा राजीनामा देत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी उमेदवारी प्रक्रियेत महेश पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा होती. निवडणुकीत पवार यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले आणि नगर परिषदेत पक्षाने प्रथमच उल्लेखनीय यश संपादन केले. नगराध्यक्षपद मात्र अल्प फरकाने हुकले.

यानंतर महेश पवार यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. मात्र, त्यानंतर पक्षात अंतर्गत गटबाजी आणि मतभेद वाढल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा आहे. पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पक्षातील मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहतात, तर दुसरीकडे पक्षाच्या काही कार्यक्रमांनाही पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

अलीकडेच एका स्थानिक नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर शहराध्यक्ष म्हणून महेश पवार यांचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, गेल्या काही दिवसांतील पक्षाच्या विविध कार्यक्रमांनाही ते उपस्थित नसल्याने पक्षातील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पवार समर्थकांचा दावा आहे की नगर परिषद निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. तर दुसऱ्या गटाकडून महेश पवार यांनी निवडणुकीत योग्य नियोजन केले नाही आणि अतिआत्मविश्वासामुळे भाजपला नगराध्यक्षपद गमवावे लागल्याचा आरोप केला जातो.

घाटंजी भाजपमध्ये विविध गट सक्रिय असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. यापूर्वी पदाधिकारी निवडीत पारवेकर गटाचा प्रभाव असल्याचे मानले जात होते. मात्र, यावेळी तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदांची निवड आमदार राजू तोडसाम यांच्या इच्छेनुसार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्याच्या नाराजीमागे हेही एक कारण असू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

या संदर्भात शहराध्यक्ष महेश पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

सध्या भाजपमध्ये माजी मंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर तसेच अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शेतकरी नेते देवानंद पवार यांचे स्वतंत्र समर्थक गट असल्याचे मानले जाते. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात या गटबाजीचा पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर आणि निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande