वर्धा: वन्यजीवांच्या संवर्धनासाठी गवत लागवड
वर्धा 10 जुलै (हिं.स.)वन्यजीवांचे संरक्षण, जंगलातील जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक गवताळ अधिवासाची पुनर्निर्मिती तसेच जल व मृदासंधारणाला चालना देण्याच्या उद्देशाने गिरड व्याघ्र सफारी प्रकल्पांतर्गत गिरड बीटातील कक्ष क्रमांक ३१५ राखीव वनात १० हेक्टर
वन्यजीवांच्या संवर्धनासाठी गवत लागवड


वर्धा 10 जुलै (हिं.स.)वन्यजीवांचे संरक्षण, जंगलातील जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक गवताळ अधिवासाची पुनर्निर्मिती तसेच जल व मृदासंधारणाला चालना देण्याच्या उद्देशाने गिरड व्याघ्र सफारी प्रकल्पांतर्गत गिरड बीटातील कक्ष क्रमांक ३१५ राखीव वनात १० हेक्टर क्षेत्रावर श्रमदानातून गवत लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गिरडचे सरपंच राजू नौकरकर, मोहगावचे सरपंच विलास नवघरे, सहाय्यक उपवनसंरक्षक सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे, गिरडचे क्षेत्र सहाय्यक गणेश राऊत, वन व्यवस्थापन समिती शिवणफळचे अध्यक्ष गजानन गारगाटे उपस्थित होते. याशिवाय वन कर्मचारी, वनमजूर, रोपण चौकीदार, आर.आर.टी. पथक आणि परिसरातील ग्रामस्थांनी श्रमदान करून उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमात घोन्याड, मोती तुरा, बेर, मोठी डोंगरी, लहान डोंगरी, मोशन आणि रान शेवरा या गवताच्या विविध प्रजातींच्या एकूण ७३ किलो बियाण्यांची पेरणी करण्यात आली. या प्रजातींचे गवत जलद वाढणारे, मृदेला घट्ट पकडून ठेवणारे आणि वन्यजीवांसाठी पौष्टिक चाऱ्याचे महत्त्वपूर्ण स्रोत मानले जाते. यामुळे हरिण, सांबर, चितळ, नीलगाय, रानससे यासारख्या शाकाहारी वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात पुरेसा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गवत कुरणांच्या विकासामुळे पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते, मृदा धूप कमी होते, भूजल पातळी वाढण्यास मदत होते आणि जंगलातील नैसर्गिक परिसंस्था अधिक सक्षम बनते. तसेच गवताळ क्षेत्रामुळे वनातील आगीचा धोका कमी होण्यास, विविध पक्षी, कीटक आणि लहान वन्यजीवांना आश्रय मिळण्यासही मदत होते.

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande