
अमरावती, 10 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित पाणीपुरवठा, पाण्याची गुणवत्ता कायम राखणे आणि नागरिकांमध्ये जलसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद अमरावतीच्या जल जीवन मिशनतर्फे ‘जलसुरक्षा@५०’ या ५० दिवसांच्या विशेष जनजागृती अभियानाचा आजपासून प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे पुढील ५० दिवस पावसाळ्यातील जलसुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांना सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभियानांतर्गत जलजीवन मिशनच्या माहिती, शिक्षण व जनजागृती कक्षामार्फत दररोज जलसुरक्षेविषयी विशेष माहितीपर पोस्टर तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची सुरक्षित देखभाल, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, क्लोरिनेशन, जलस्रोतांचे संरक्षण, पाणीजन्य आजारांपासून बचाव, ग्रामपाणी व स्वच्छता समित्यांच्या जबाबदाऱ्या, नागरिकांचा सहभाग तसेच पावसाळ्यात घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत माहिती दिली जाणार आहे.
या अभियानाचा जिल्हा आणि तालुकास्तरावरील यंत्रणांमार्फत व्यापक प्रसार केला जाणार असून, ग्रामपंचायती, ग्रामपाणी व स्वच्छता समित्या, पाणीपुरवठा कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून हा संदेश गावागावांत पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या नेतृत्वाखाली माहिती, शिक्षण व जनजागृती कक्ष कार्यरत आहे.
नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असल्याने सुरक्षित पाणीपुरवठा व्यवस्थापनाबरोबरच नागरिकांनीही आवश्यक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोकसहभाग वाढविणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जलजीवन मिशनची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी