बालकांना संतविचारांचा वारसा; साहित्यसंपदेतर्फे 'संतांचिये गावी' उपक्रम
रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : अलिबाग येथे आषाढी वारीचे औचित्य साधत आजच्या पिढीला महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख करून देण्यासाठी साहित्यसंपदा संस्थेतर्फे ''संतांचिये गावी'' या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यसंपदा स
Legacy of Saintly Teachings for Children: 'Santanchiye Gaavi' Initiative by Sahityasampada


रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : अलिबाग येथे आषाढी वारीचे औचित्य साधत आजच्या पिढीला महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख करून देण्यासाठी साहित्यसंपदा संस्थेतर्फे 'संतांचिये गावी' या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम ८ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

दिलीप मोकल लिखित 'संतांचिये गावी' या सदरावर आधारित या स्पर्धेत संत साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध संतांचे जीवनकार्य, विचार, संस्कार आणि समाजप्रबोधनाची परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील विविध शाळा या उपक्रमात सहभागी होणार असून, प्रत्येक सहभागी शाळेला सहभाग सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा सलोनी बोरकर यांनी दिली.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रश्नमंजुषेतील पहिल्या पाच महाविजेत्यांना स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशनतर्फे कै. डॉ. अनिश गांगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा फाउंडेशनचे किरण बोरकर यांनी केली.

या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना संत साहित्याची गोडी लागावी, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा समृद्ध वारसा समजावा आणि संतांचे विचार त्यांच्या जीवनात रुजावेत, हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कार्यवाहक मानसी नेवगी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande