
रायगड, 10 जुलै (हिं.स.)। खरे सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून पेण तालुक्यातील एका व्यक्तीची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पेण तालुक्यातील देवआळी येथील रहिवासी आहेत. आरोपी क्रमांक 1 याने आपल्या मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत फिर्यादींना खऱ्या सोन्याची नाणी विकण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या एका साक्षीदाराला हुबळी (कर्नाटक) येथे बोलावण्यात आले.
तेथे आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी साक्षीदाराच्या उपस्थितीत फिर्यादींकडून 20 लाख रुपये स्वीकारले. त्याबदल्यात दिलेली सोन्याची नाणी खरी असल्याचा विश्वास आरोपींनी दिला. मात्र, नंतर ती नाणी खोटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 152/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 318(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, सोन्याचे व्यवहार करताना नागरिकांनी संबंधित विक्रेता व वस्तूची खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)