सोलापूरच्या सात रस्ता येथील नाना-नानी पार्कचा होणार कायापालट
सोलापूर, १० जुलै (हिं.स.) : सात रस्ता परिसरातील नाना-नानी पार्कचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक, आकर्षक आणि सर्व सुविधांनी युक्त उद्यान म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पदाध
Kdkd


सोलापूर, १० जुलै (हिं.स.) : सात रस्ता परिसरातील नाना-नानी पार्कचे सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक, आकर्षक आणि सर्व सुविधांनी युक्त उद्यान म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्यानाची संयुक्त पाहणी करून प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला.

या पाहणीत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते.

पाहणीदरम्यान उद्यानातील विद्यमान सुविधांची तपासणी करण्यात आली. विशेषतः पावसाळ्यात उद्यान परिसरात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

नूतनीकरणाच्या आराखड्यात आकर्षक प्रवेशद्वार, दर्जेदार वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, सजावटीची प्रकाशयोजना, हिरवळीचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळणी, ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच नियमित स्वच्छता आणि देखभाल यांचा समावेश करण्यात येणार आहे.

महापौर विनायक कोंड्याल यांनी नूतनीकरणाचा आराखडा तातडीने अंतिम करून सर्व कामे उच्च दर्जाची आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नाना-नानी पार्क हे शहरातील, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे केंद्र आहे. त्याचा आदर्श पद्धतीने विकास करून नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनीही नागरिकांच्या गरजा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पार्कमध्ये सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, उत्कृष्ट प्रकाशयोजना, आधुनिक सुविधा आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी व पूर्ण सहकार्य स्थायी समितीकडून उपलब्ध करून दिले जाईल, असे स्पष्ट केले.

------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande