
* मॅनहोल तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९३२४५००६००) सुरू
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना तक्रारींची जलद नोंदणी व त्वरित निवारणासाठी अधिक सक्षम आणि पारदर्शक तक्रार व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना उघडे, तुटलेले अथवा गायब झालेले मॅनहोल कव्हर, गटाराच्या झाकणांशी संबंधित समस्या तसेच इतर नागरी तक्रारी विविध डिजिटल माध्यमांतून सहजपणे नोंदविता येणार आहेत.
उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यासंदर्भातील तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र व्हॉट्सॲप चॅटबॉट (९३२४५००६००) उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांनी संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून संवाद सुरू करावा. त्यानंतर तक्रार सबमिट करा हा पर्याय निवडून घटनास्थळाचे लोकेशन (Location) शेअर करावे आणि समस्येचे छायाचित्र अपलोड करावे. तक्रार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक प्राप्त होईल.
'माय बीएमसी मार्ग'वर अशी नोंदवा तक्रार
नागरिकांनी प्रथम 'माय बीएमसी मार्ग' ॲप उघडून मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या साहाय्याने लॉग-इन करावे. त्यानंतर 'नवीन नोंदणी (New Registration)' हा पर्याय निवडून तक्रारीचा प्रकार निवडावा. आवश्यक असल्यास समस्येचे थोडक्यात वर्णन नमूद करावे. संबंधित ठिकाणाचे विद्यमान छायाचित्र अपलोड करावे किंवा जिओ-टॅग केलेले छायाचित्र काढून अपलोड करावे. त्यानंतर तक्रार सादर केल्यानंतर नागरिकाला पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक (Complaint Registration Number) प्राप्त होतो.
इतर माध्यमांतूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा
'माय बीएमसी मार्ग' आणि स्वतंत्र मॅनहोल चॅटबॉट व्यतिरिक्त नागरिकांना महानगरपालिकेच्या व्हॉट्सॲप चॅटबॉट (८९९९२२८९९९), अधिकृत संकेतस्थळ आणि १९१६ हेल्पलाईनद्वारेही तक्रारी नोंदविता येतात. व्हॉट्सॲप चॅटबॉट (८९९९२२८९९९) वर तक्रारीचे ठिकाण आणि छायाचित्र पाठवून तक्रार नोंदविता येते. खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी खड्डा किंवा ख, तर गटाराच्या झाकणासंदर्भातील तक्रारींसाठी मॅनहोल किंवा म असा संदेश पाठविता येतो.
महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर 'नागरिकांकरिता → अर्ज करा → तक्रारी → सर्व' या पर्यायाद्वारेही नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तसेच १९१६ हेल्पलाईनवर कॉल करून तक्रारीचा तपशील दिल्यासही तक्रार नोंदविता येते. ज्या तक्रारींसाठी छायाचित्र आवश्यक आहे, त्या प्रकरणात जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करण्यासाठी किंवा काढण्यासाठी नागरिकांना लिंक पाठविण्यात येते.
बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर तसेच इतर धोकादायक नागरी समस्या आढळल्यास तात्काळ उपलब्ध तक्रार माध्यमांचा वापर करून माहिती द्यावी. तक्रारींची जलद नोंदणी आणि प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी 'माय बीएमसी मार्ग' मोबाईल प्रणाली किंवा व्हॉट्सॲप चॅटबॉट (८९९९२२८९९९) यांचा वापर करावा. तसेच उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यासंदर्भातील तक्रारींसाठी विशेषतः स्वतंत्र व्हॉट्सॲप चॅटबॉट (९३२४५००६००) चा वापर करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी