
लातूर, 10 जुलै (हिं.स.)। मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त दि. १० जुलै रोजी मौजे गव्हाण, ता. जळकोट, जि. लातूर येथे जनजागृती व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अनुसूचित जमाती बहुल असलेल्या गव्हाण गावात हा कार्यक्रम आयोजित करून मत्स्य व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत ग्रामस्थ व मत्स्य शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. आर. खरटमोल होते. प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पत्तेवार, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सेवानिवृत्त लाईनमॅन एकनाथ गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोडरूळ उपस्थित होते. सहयोगी अधिष्ठाता डॉ.खरटमोल यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या 'आबा धरती' योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सोमनाथ आर.यादव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे महत्त्व, देशाच्या निळ्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाचे वाढते योगदान, शाश्वत मत्स्यपालनाची आवश्यकता तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व मुख्यमंत्री मत्स्य व्यवसाय विकास योजनेसह विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्रामीण व विशेषतः अनुसूचित जमाती समाजातील युवकांनी आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाचा अवलंब करून मत्स्य व्यवसायातून रोजगार व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व यशस्वी समन्वय डॉ. सोमनाथ यादव यांनी केले.
यावेळी श्री.अमोल मुसणे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, लातूर यांनी शासनाच्या विविध मत्स्य व्यवसाय विकास योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी उपलब्ध अनुदान व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रगतिशील मत्स्य शेतकरी श्री. साबेर शेख (उदगीर) यांनी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मत्स्य संवर्धन, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि यशस्वी मत्स्यपालनाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा दलित मित्र, पत्रकार श्री.बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी गव्हाण गावाच्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेची माहिती देत हे गाव अनुसूचित जमाती बहुल असून येथील नागरिक कष्टाळू, प्रामाणिक आणि विकासाभिमुख असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ घेऊन अनुसूचित जमाती समाजाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाने अशा दुर्गम व आदिवासीबहुल गावात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करून जनजागृतीचा घेतलेला उपक्रम त्यांनी विशेष कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis