
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवत नियमबाह्य रिक्षांविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत 115 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 61 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. तसेच 11 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून एकूण 4 लाख 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यंदा आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2025 रोजी असून, यात्रा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे. शहरातील विविध भागांतून भाविकांची मोठ्या प्रमाणावर रिक्षांद्वारे वाहतूक होत असल्याने प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
भाविकांची वाहतूक सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित राहावी, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक रोखावी तसेच निश्चित दरापेक्षा जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके नियुक्त केली आहेत.
पंढरपूर शहर आणि परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षांची पोलीस व परिवहन विभागाकडून संयुक्त तपासणी सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे, अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड