
रत्नागिरी, 10 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत मागील आर्थिक वर्षात ग्राहकांकडून १०१५ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार पूर्ण केले आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील ग्राहकांना आधुनिक व सुरक्षित बँकिंग सेवेशी जोडण्याच्या बँकेच्या धोरणामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. विशेषतः यूपीआय प्रणालीद्वारे ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून बँकेच्या ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढलेला कल यावरून स्पष्ट होत आहे.
ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कुठूनही सहज व्यवहार करता यावेत, या उद्देशाने बँकेने एटीएम, मोबाइल बँकिंग, क्यूआर कोड आणि साऊंड बॉक्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शाखांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता मोहिमा, ग्राहक मेळावे आणि फिरत्या एटीएम व्हॅनद्वारे बँकेने जनजागृती केली. या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांचा डिजिटल बँकिंगवरचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे. व्यवहारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी बँकेने एसएमएस अॅलर्ट सेवा आणि चोवीस तास सायबर सुरक्षिततेसाठी विशेष देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ एप्रिल ते ३० जून २०२६ या काळात बँकेतून मोबाइल बँकिंगद्वारे ३.०४ कोटी, यूपीआयद्वारे २६८.१० कोटी, क्यूआर कोडद्वारे ८.२९ कोटी, आयएमपीएसद्वारे १७.३२ कोटी आणि एटीएमद्वारे ३४.०९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
या यशाबद्दल बोलताना बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, जिल्ह्यातील ७६ शाखांमार्फत ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. डिजिटल सेवांमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचत असून व्यवहार अधिक सोपे झाले आहेत. सध्या बँक १९ एटीएम केंद्रे आणि ३ फिरत्या एटीएम व्हॅनद्वारे सेवा देत आहे. लवकरच एईपीएस (AEPS) सेवेचा प्रारंभ करून डिजिटल तंत्रज्ञानामध्ये बँक आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. आगामी काळातही ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार नवीन डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहकार क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या रत्नागिरी जिल्हा बँकेने आता जिल्ह्यातील नागरिकांना बँकेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी