
यवतमाळ, १० जुलै (हिं.स.) : जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या रस्ता सुरक्षा अभियान आणि कठोर वाहतूक अंमलबजावणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात रस्ते अपघातांमध्ये यंदा लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत अपघात, मृत्यू आणि जखमींच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे पोलिस विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ४६७ रस्ते अपघात झाले होते. त्यामध्ये २६५ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ३२६ जण जखमी झाले होते. याउलट, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत अपघातांची संख्या ३६७ वर आली असून, २१२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२९ नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे अपघातांमध्ये १००, मृत्यूंमध्ये ५३ आणि जखमींच्या संख्येत ९७ ने घट झाली आहे.
अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी अतिवेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर टाळणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविली. यासोबतच विविध स्तरांवर जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी एसटी बसचालक, खासगी प्रवासी वाहतूक व्यावसायिक, ट्रक व लॉरी चालक, ऑटोरिक्षा संघटना तसेच अन्य व्यावसायिक वाहन चालकांशी संवाद साधून सुरक्षित वाहनचालना, वेगमर्यादेचे पालन, थकलेल्या अवस्थेत वाहन न चालविणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
याशिवाय शाळा, महाविद्यालये, ग्रामपातळीवरील कार्यक्रम आणि विविध वाहतूक संघटनांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणांची सातत्याने पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून परावर्तित फलक, रोड मार्किंग, कॅट आयज आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.
या सर्व उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी