रायगड - १३ जुलैपर्यंत खड्डे न बुजवल्यास रस्त्यातच वृक्षारोपण; शिवसेनेचा इशारा
रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : श्रीवर्धन शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) श्रीवर्धन शहरप्रमुख शिवराज
Shiv Sena warns of planting trees on the road itself if potholes are not filled by July 13.


रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : श्रीवर्धन शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) श्रीवर्धन शहरप्रमुख शिवराज संदीप चाफेकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे.

निवेदनात शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवराज चाफेकर यांनी प्रशासनाला १३ जुलै २०२६ पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यास १४ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने शहरातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने 'शिवसेना स्टाईल' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शदाब पटेल, भावेश पालेकर तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागणीची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande