
- आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही
नाशिक, 10 जुलै (हिं.स.)।
: नाशिक महापालिकेच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला जोर आला आहे. ठाकरे गटाच्या १५ नगरसेवकांनी एकत्र येत, ५ कोटी रुपयांच्या निधीचे आमिष दाखवत एजंटमार्फत फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटावर केला हो. या आरोपांना आता शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिक महापालिकेत ठाकरे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे गटाकडून प्रभागनिहाय निधी आणि उपमहापौरपदाचे आमिष दाखवण्यासाठी एका वकिलाला एजंट म्हणून पाठवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी केला होता. तसेच, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, असा दावा केला. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजय बोरस्ते म्हणाले, हे आरोप पूर्णपणे हास्यास्पद असून त्यातून ठाकरे गटातील अस्वस्थता दिसून येते. आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. कोण एजंट आहे, कोण आमची वकिली करतो, हे आम्हालाही कळू द्या; आम्ही त्याचाही शोध घेऊ. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे कोणीही आमच्यासोबत येऊ शकते. राज्यभरात प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे नाशिकमध्येही काही राजकीय घडामोडी झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
कुछ भी हो सकता है
गोकुळ गिते यांच्या संदर्भात बोलताना बोरस्ते म्हणाले की, उबाठाने गोकुळ गिते यांना मतदान केले होते. ते आता शिंदे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे पुढे काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही घोडेबाजार चालत नाही. राजकारणात कुछ भी हो सकता है, आगे आगे देखो असेही त्यांनी शेवटी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV