
लातूर, 10 जुलै (हिं.स.)।
संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आयोजनात कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी किशोर जाधव शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर शिवणीकर बराच काळ फरार होता आणि पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि अपहाराच्या रकमेबाबत पोलीस अधिक तपास करत असून, आणखी काही संबंधित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis