
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेने १ ते ९ जुलै या कालावधीत शहरातील आठही झोन आणि २६ प्रभागांमध्ये राबविलेली विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली. या नऊ दिवसांच्या अभियानात तब्बल ९८.५ टन कचरा उचलण्यात आला, तर १९०.५ ब्रास दगड, माती आणि मलबा हटविण्यात आला.
महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्ते, चौक, नाले, पदपथ, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय कार्यालयांच्या परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली. याशिवाय कचरा संकलन, दगड-माती व मलबा हटविणे, अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स काढणे, झुडपे व गवत हटविणे, रस्ते धुणे तसेच डिव्हायडर्सची स्वच्छता अशी विविध कामे हाती घेण्यात आली.
ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जेसीबी, डंपर, घंटागाड्या, ट्रॅक्टर आणि पाणी टँकर यांसह विविध यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
महानगरपालिकेने भविष्यातही अशा विशेष स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, 'स्वच्छ सोलापूर' साकार करण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड