
लातूर, 10 जुलै, (हिं.स.)। अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. १ च्या न्यायाधीशांनी चाकूर पोलीस ठाण्यातील खूनाच्या प्रयत्नाच्या एका गंभीर गुन्ह्यात महत्त्वपूर्ण निकाल देत दोन आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२४ रोजी चाकूर तालुक्यातील मोहदळ गावात घडली होती. फिर्यादी पल्लवी अर्जुन निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांच्या पतीला, अर्जुन सूर्यकांत निकम यांना 'पोलीसात तक्रार का दिली' या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत काठ्यांनी जबर मारहाण केली होती. या हल्ल्यात अर्जुन निकम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कवटीला फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे यांनी अत्यंत बारकाईने व शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण केला. त्यांनी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सत्र खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुजाता कदम यांनी प्रभावी युक्तिवाद केला, ज्याला पोलीस अंमलदार चंद्रकांत राचमाळे आणि प्रमोद तरडे यांच्या पैरवीमुळे मोठी मदत झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गौरव उर्फ ज्योतिबा चंद्रकांत निकम व सविता चंद्रकांत निकम यांना भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (भाग-२) सह कलम ३(५) अन्वये दोषी ठरवले आणि प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास व १५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis