
- आरबीएसकेमुळे मिळाले नवे आयुष्य
अमरावती, 10 जुलै (हिं.स.) | मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जारिदा व डोमा येथील दोन विद्यार्थिनींवर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. आश्रमशाळा पथक, चिखलदरा यांच्या पुढाकारामुळे या दोन्ही विद्यार्थिनींना नवे आयुष्य मिळाले आहे.
देशातील बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येतो. चिखलदरा तालुक्यात आश्रमशाळा पथक नियमितपणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करीत आहे. या तपासणी दरम्यान शासकीय आदिवासी आश्रमशाळा जारिदा येथील इयत्ता दुसरीतील आरची हिरालाल जामूनकर आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा डोमा येथील इयत्ता सातवीतील प्रतिभा प्रदीप कासदेकर या विद्यार्थिनींना जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. यानंतर चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून दोन्ही विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दोघींवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी आरबीएसकेचे नोडल अधिकारी डॉ. हेमंत लोखंडे, डॉ. वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज हेडाऊ, ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ गवई, आरबीएसके कार्यक्रमाचे डीपीएस नीलेश पुनसे तसेच आश्रमशाळा पथकाचे सहकार्य लाभले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत लोखंडे म्हणाले की, दुर्गम व आदिवासी भागातील बालकांना वेळेवर आजाराचे निदान करून मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात आरबीएसके महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मेळघाटातील आरोग्यसेवेला आणखी बळ मिळाले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी