रायगडातील जलस्रोत दूषित; प्रशासन सतर्क, नागरिकांनीही घ्या खबरदारी
रायगड, 10 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात सलग सहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी पूरानंतर दूषित पाण्यामुळे जलजन्य साथींच्या आजारांचे संकट निर्माण झाले आहे. रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण आदी भागांत पूर
Water-sources-at-Raigad-contam


रायगड, 10 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात सलग सहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी पूरानंतर दूषित पाण्यामुळे जलजन्य साथींच्या आजारांचे संकट निर्माण झाले आहे. रोहा, नागोठणे, माणगाव, महाड, पेण आदी भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहिले. परिणामी घरे, बाजारपेठा तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुराच्या पाण्याखाली गेले.

पूराच्या पाण्यासोबत गाळ, चिखल, सांडपाणी आणि कचरा विहिरी, बोअरवेल, तलाव तसेच स्थानिक पाणीपुरवठा योजनांमध्ये मिसळल्याने अनेक जलस्रोत दूषित झाले आहेत. काही गावांमध्ये नळाद्वारे गढूळ व चिखलयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजना आणि प्रादेशिक नळपाणी योजनांवरही या परिस्थितीचा परिणाम झाला असून पाणी शुद्धीकरण केंद्रांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पूरामुळे दूषित झालेल्या सर्व जलस्रोतांचे तातडीने शुद्धीकरण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी क्लोरीनेशन, निर्जंतुकीकरण आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आरोग्य विभागानेही अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आणि कॉलरासारख्या जलजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गावागावांत पाण्याचे नमुने तपासणे, जनजागृती मोहीम राबविणे आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी पिण्याचे पाणी किमान १५ ते २० मिनिटे उकळून वापरावे, क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा, गढूळ पाणी पिणे टाळावे आणि उलट्या, जुलाब, ताप किंवा पोटदुखीची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूरानंतर निर्माण झालेल्या या आरोग्यविषयक संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande