
पुणे, 10 जुलै (हिं.स.)। कुशल युवकांना आपल्या कौशल्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करण्याची संधी देणाऱ्या स्पर्धेतून उत्कृष्ट उमेदवारांची निवड करून त्यांना पुढे WorldSkills सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात येत असून, या स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा प्रमुख पात्रता निकष असून अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स , क्लाउड कॉम्प्युटिंग, डेंटल प्रोस्थेटिक्स, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, वॉटर टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टिम्स इंटिग्रेशन या कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. इतर ५० कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील पात्र उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु