
सोलापूर, 10 जुलै, (हिं.स.)। भिमा नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी दिला जाणारा आठ तासांचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सततचे लोडशेडिंग, वारंवार होणारे ट्रिपिंग आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे खरीप हंगामातील पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेती संकटात सापडल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल अरुण कौलगे पाटील यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कौलगे पाटील यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर थेट जाब विचारणार आहेत. भिमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नियमानुसार मिळणारा आठ तासांचा अखंड वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.
वीजपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यास, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांना चंद्रभागा नदीच्या पाण्याने आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सततच्या वीजखंडितामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले असून खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महावितरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड