
रत्नागिरी, 10 जुलै, (हिं.स.) । लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि सीईटीपी (कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट)च्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रदूषणाच्या घटनांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी तसेच बाधितांना न्याय मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
समितीचे समन्वयक भरत लब्धे यांनी सीईटीपीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या, अशी टीका केली. सीईटीपीचे अध्यक्ष सुप्रिया केमिकल्सचे मालक असून गेल्या पंधरा दिवसांतील प्रदूषणाच्या घटनांमुळे संबंधित कंपनीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना अशा व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती कशी करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फेब्रुवारी महिन्यात सोनगाव येथे रासायनिक प्रदूषणामुळे पाच दुधाळ गाई मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेचा उल्लेख करत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंपनी किंवा एमआयडीसीमार्फत शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही समितीने केली.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रादेशिक अधिकारी घरत यांच्या उपस्थितीत पुढील पंधरा दिवसांत विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत प्रदूषणाच्या घटनांची सखोल चौकशी, जबाबदारांवर कारवाई आणि बाधितांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.
माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस समितीचे समन्वयक भरत लब्धे, अनंत दिवेकर, प्रभाकर सैतवडेकर, राजन इंदूलकर, पंकज दळवी, राजेश पाथरे, बापू काणे, सुनील खेडेकर, तुळशीराम पवार, इब्राहीम दलवाई, कैसर देसाई, स्वाती भोजने, रविना गुजर, तृप्ती कदम, निर्मला जाधव, संतोष मोहिते, प्रवीण पाकळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी