
पुणे, 10 जुलै (हिं.स.)।
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने चारही धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी, खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्गही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून १६.१७ टीएमसी, म्हणजेच ५५.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
दिवसभरात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात पावसाची नोंद झाली नाही. तर टेमघर धरण परिसरात केवळ ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवकही तुलनेने मंदावली आहे.
दरम्यान, पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यापूर्वी बुधवारी एका दिवसात धरणाच्या सांडव्यातून १.५१ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
हवामानातील बदल आणि पावसाच्या पुढील स्थितीनुसार धरणांतील पाणीसाठा व विसर्गाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु