पुण्यात वन विभागाची मोठी कारवाई; बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। बिबट्याची शिकार करून त्याची कातडी आणि अन्य अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून बिबट्याची कातडी, १५ नखे आणि दोन सुळेदात जप्त करण्यात आले असून, वन्यजीव तस्करीविरोधातील ही महत्त्वा
पुण्यात वन विभागाची मोठी कारवाई; बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक


पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। बिबट्याची शिकार करून त्याची कातडी आणि अन्य अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून बिबट्याची कातडी, १५ नखे आणि दोन सुळेदात जप्त करण्यात आले असून, वन्यजीव तस्करीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदेश रेवजी पारधी (वय २५) आणि शुभम बाळू पारधी (वय २१) अशी असून, दोघेही जुन्नर तालुक्यातील वरखेडे डिंगोरे येथील रहिवासी आहेत. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वन विभागाला या अवैध व्यवहाराची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संगमवाडी परिसरातील पर्पल कॅफे परिसरात सापळा रचला. आरोपी व्यवहारासाठी तेथे आल्यानंतर त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी, १५ नखे आणि दोन सुळेदात जप्त करण्यात आले.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, वनविभागीय अधिकारी अमोल थोरात तसेच सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण आणि नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

या मोहिमेत वनपाल आर. टी. रुपनवर, वैभव बाबर, शीतल खंडके तसेच वनरक्षक वैभव कंक, अंकुश कचरे, अनिल राठोड, रमेश शिंदे, अशोक गायकवाड, सुरेश बर्ले, दयानंद ऐतवाड, गणेश यमगर, ओंकार गुंड आणि उल्हास मोरे यांनी सहभाग घेतला. वन विभाग पुढील तपास करत असून, या प्रकरणामागे आणखी कोणते तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande