
पुणे, 10 जुलै (हिं.स.)। मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेतील जखमींची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी मेडिकव्हर हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांनी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला आणि महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
यावेळी महापौरांनी जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा आढावा घेत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख तथा नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे यांच्याकडून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली.
जखमींना सर्वोत्तम आणि तातडीचे वैद्यकीय उपचार मिळावेत, उपचारासाठी आवश्यक असलेला सर्व शासकीय समन्वय तात्काळ पूर्ण करावा तसेच प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, मोशीतील दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. प्रत्येक बाधित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नागरिकांचे प्राण आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये आणि आवश्यक त्या प्रत्येक स्तरावर महापालिका त्यांच्यासोबत राहील.
दुर्घटनेतील जखमी नागरिकांनी लवकर बरे व्हावे आणि त्यांच्या कुटुंबियांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
महापालिका प्रशासनाकडून बचावकार्य, वैद्यकीय उपचार, विविध विभागांतील समन्वय आणि बाधित नागरिकांना आवश्यक सर्व प्रशासकीय मदत प्राधान्याने सुरू असून, संपूर्ण यंत्रणा मदतकार्यात कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु