
पुणे, 10 जुलै (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेली दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. मात्र, संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल बांधकाम, कचरा डेपो आणि इमारतीमधील सुरक्षित अंतर यासह सर्व बाबींची बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या दुर्घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात आंदोलन सुरू केले आहे.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून बचाव व शोधकार्य सुरू असून ते अखंडपणे सुरू आहे. बाहेरून पाहणाऱ्यांना शोधकार्य मंदावल्याचे वाटू शकते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असल्याने प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागत आहे.
त्यांच्या माहितीनुसार, कोसळलेल्या इमारतीतील एका लहान पॅन्ट्रीमध्ये आठ जण अडकले असल्याची शक्यता असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कचरा हटविण्याचे काम सुरू आहे. यासाठी सध्या १२ यंत्रांच्या सहाय्याने कचरा हटविला जात असून आणखी १० यंत्रेही घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत.
बचाव पथके आता इमारतीत प्रवेश करण्यासाठी मार्ग तयार करत आहेत. या दुर्घटनेत इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब एकमेकांवर कोसळल्याने बचावकार्य अधिकच कठीण झाले आहे. त्यातच कचऱ्यामुळे मिथेन वायू तयार होत असल्याने बचाव पथकांना अतिरिक्त दक्षता घ्यावी लागत आहे.
नातेवाईकांच्या भावना समजून घेत त्यांना प्रशासनाकडून सातत्याने धीर दिला जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. त्यांनी बचावकार्य परिस्थितीनुसार वेगाने आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत सुरू असल्याचा पुनरुच्चार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु