संजय राऊत, पोलिसांचा अपमान करू नका; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। पोलीस घरगडी आहेत असे म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना एक सवाल आहे, ''वाझे काय लादेन आहे का'', म्हणत उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवून खंडणी वसूल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या सचिन वाझेची पाठराखण स्वतः तत्कालीन
संजय राऊत, पोलिसांचा अपमान करू नका; नवनाथ बन यांची खरमरीत टीका


मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। पोलीस घरगडी आहेत असे म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना एक सवाल आहे, 'वाझे काय लादेन आहे का', म्हणत उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवून खंडणी वसूल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या सचिन वाझेची पाठराखण स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती तेव्हा हा सचिन वाझे तुमचा घरगडी म्हणून काम करत होता का? पोलिसांचा अपमान करू नका. पोलिसांबद्दल असे बोलाल तर महाराष्ट्रातले पोलिस आणि जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली.

श्री. बन म्हणाले की, सध्या एकमेकांवर टीका करणारे शरद पवार गटाचे आमदार आणि संजय राऊत आणि हे एका विचारासाठी एकत्र आले नव्हते तर केवळ महाराष्ट्राचा विनाश करायचा हे त्यांचे एकमेव धोरण होते. त्यांच्यात ना कुठला अजेंडा आहे ना कुठली एकवाक्यता. एकमेकांना शिव्या घालणे आणि टीकाटिप्पणी करणे इतकेच काम महाविकास आघाडीच्या नेत्यांना उरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही महाविकास नाहीतर महाविनाश आघाडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

जनाब संजय राऊत सांगताहेत की नांदेडमध्ये पूल कोसळला. नांदेडमध्ये पूल नाही तर एक छोटीशी भिंत कोसळली आणि तीही तातडीने दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. कामात कोणता गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितपणे चौकशी करून कारवाई केली जाईल. पण तुमच्यासारखे कंत्राटदार, महापालिकेकडून कमिशनखोरी करत मातोश्री 2 बांधणारे नेते आमच्याकडे नाहीत. कट, कमिशन, खंडणी हे तुमचे धंदे आहेत आणि महाराष्ट्राने कोविडच्या काळात ते पाहिले आहे. मुंबईचे वाटोळे केले त्यांनी विकासकामाबद्दल न बोललेलेच बरे, असे श्री. बन यांनी सुनावले.

पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही. दोषी असतील त्यांची चौकशी करून कारवाई होईल. कोविडकाळात कफनमध्ये घोटाळा करत मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले, खिचडीत घोटाळा केला, सर्वसामान्य नागरिकांना सोडले नाही, रेमेडीसिवर मिळत नव्हते, अशी अवस्था होती ते महाराष्ट्राने पाहिले आहे. पत्राचाळीत हजारो कोटी रुपये कमावणारे संजय राऊत, तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात. अद्याप तुमची निर्दोष सुटका झालेली नाही. तुम्हाला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल श्री. बन यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी हे डिझास्टर मॅन आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे. कारण दोघांनी काँग्रेसचे पूर्ण वाटोळे केले. प्रसिद्धीसाठी खालच्या स्तराचे शब्द वापरून टीका करणारे हर्षवर्धन सपकाळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसचे कर्दनकाळ आहेत तर देशातले डिझास्टर मॅन म्हणून राहुल गांधींना संपूर्ण देश ओळखतो. महाराष्ट्राच्या विकासाची घडी बसवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार अतिशय खंबीर आहेत. डिझास्टर झालेल्या पक्षाची आणि डिझास्टर मॅन असलेल्या प्रदेशाध्यक्षांची या महाराष्ट्राला गरज नाही, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande