पुण्यात एनडीए कॅडेटचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू, प्रशासनाकडून चौकशी सुरू
पुणे, 10 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे प्रथम सत्रातील १७ वर्षीय छात्र अभिनव बाजपेयी (मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा शुक्रवारी (१० जुलै) सकाळी नियमित शारीरिक प्रशिक्षणादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. या घ
NDA


पुणे, 10 जुलै (हिं.स.)।

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे प्रथम सत्रातील १७ वर्षीय छात्र अभिनव बाजपेयी (मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा शुक्रवारी (१० जुलै) सकाळी नियमित शारीरिक प्रशिक्षणादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर एनडीए प्रशासनाने सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

अभिनव बाजपेयी याने २४ जून २०२६ रोजी एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. शुक्रवारी सकाळी प्रवेशानंतरच्या पहिल्या अधिकृत शारीरिक प्रशिक्षण (पीटी) परेडदरम्यान त्याने अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. काही वेळातच तो बेशुद्ध पडल्याने सहकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने अभिनववर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी एनडीए प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृत छात्राच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पोलिस यंत्रणेला घटनेची माहिती देण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande