
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित पंढरपूर नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत अतिक्रमणविरोधी कारवाई आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही मुद्द्यांवर दोन्ही गट आमनेसामने आले, तर काही निर्णयांवर त्यांनी एकत्र येत निषेधही नोंदविला. त्यामुळे सभागृहात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले.
नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखालीझालेल्या या विशेष सभेत आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मात्र, शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.
विरोधी नगरसेवकांनी पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर टीका करत, या कारवाईमुळे गरीब व्यापारी आणि लहान व्यावसायिकांना त्रास होत असल्याचा आरोप केला. यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली.
दरम्यान, नगरपालिका हद्दीतील रस्ते दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) सोपविण्याच्या निर्णयावरही सभागृहात तीव्र चर्चा झाली. या मुद्द्यावर मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने नाराजी व्यक्त करत निर्णयाचा निषेध नोंदविला.
चर्चेदरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक राहुल नाईक शिंदे यांनी या निर्णयाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्याची मागणी केली. मात्र, या मागणीवर इतर नगरसेवकांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगल्याचे सभागृहात पाहायला मिळाले.
एकूणच आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली ही विशेष सर्वसाधारण सभा विविध स्थानिक प्रश्नांवरील वाद, आरोप-प्रत्यारोप आणि निषेधामुळे चांगलीच गाजली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड