
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशी २५ जुलै रोजी होत असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान आणि सोलापूर जिल्ह्यातील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या पालख्या १६ ते २० जुलै या कालावधीत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रमुख पालख्यांचे वेळापत्रक
-
श्री संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) : ८ जुलै रोजी प्रस्थान; १९ जुलै रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत आगमन.
-
श्री संत तुकाराम महाराज (देहू) : ७ जुलै रोजी प्रस्थान; २० जुलै रोजी जिल्ह्यात आगमन.
-
श्री संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर) : २४ जून रोजी प्रस्थान; १९ जुलै रोजी जिल्ह्यात आगमन.
-
श्री संत सोपान महाराज (सासवड) : १२ जुलै रोजी प्रस्थान; २० जुलै रोजी जिल्ह्यात आगमन.
-
श्री संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर) : २९ जून रोजी प्रस्थान; १८ जुलै रोजी जिल्हा हद्दीत प्रवेश.
-
श्री संत एकनाथ महाराज : ७ जुलै रोजी प्रस्थान; १९ जुलै रोजी जिल्ह्यात आगमन.
१९ आणि २० जुलैला सर्वाधिक पालख्या
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज आणि संत निळोबाराय महाराज अशा चार मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर २० जुलै रोजी संत तुकाराम महाराज, संत सोपान महाराज आणि चांगावटेश्वर देवस्थान यांच्या तीन पालख्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत जिल्ह्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक पालखीसाठी नोडल अधिकारी आणि सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२१७-२७३१०१०) येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने वारकरी आणि नागरिकांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड