वारीचा उत्साह पुणे मेट्रोतही; एका दिवसात ३,५२,६०६ प्रवाशांचा नवा उच्चांक
पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याच्या आगमनाने पुणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण असताना, पुणे मेट्रोने सु
Metro Train


पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याच्या आगमनाने पुणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण असताना, पुणे मेट्रोने सुरू केलेल्या विशेष सेवांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने ३ लाख ५२ हजार ६०६ प्रवाशांची विक्रमी नोंद केली. हा आकडा पुणे मेट्रोच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्येपेक्षा अधिक असून, मेट्रो सेवेसाठी हा एक नवा मैलाचा दगड ठरला आहे.

पालखी सोहळ्यासाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनी पारंपरिक पायी प्रवासाबरोबरच शहरातील प्रवासासाठी मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामुळे स्थानकांवर आणि मेट्रो डब्यांमध्ये दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे, मेट्रोचा प्रवास हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित राहिला नाही. डब्यांमध्ये वारकरी विठ्ठल-विठ्ठल आणि ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात टाळ-मृदंगाच्या साथीने अभंग गात असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण मेट्रो परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

या अनोख्या प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये वारकऱ्यांचा उत्साह, भक्तीभाव आणि पुणे मेट्रोतील आध्यात्मिक वातावरणाचे मनोहारी दर्शन घडत आहे. त्यामुळे आधुनिक वाहतुकीची सुविधा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम यंदाच्या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande