आषाढी वारीत अत्याधुनिक सुरक्षा; एआय आणि ड्रोनच्या मदतीने पोलिसांचा २४ तास पहारा
पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी खाकी वर्दीतील पोलिसांचीही एक वेगळी वारी अविरत सुरू आहे. भक्तीच्या या महासागरात प्रत्येक वारकऱ्याच
Wari


पुणे, 10 जुलै, (हिं.स.)। टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी खाकी वर्दीतील पोलिसांचीही एक वेगळी वारी अविरत सुरू आहे. भक्तीच्या या महासागरात प्रत्येक वारकऱ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा हायटेक सुरक्षा यंत्रणा उभारली आहे.

पुणे पोलिसांच्या दळणवळण व माहिती-तंत्रज्ञान विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त विवेक पवार यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या आषाढी वारीसाठी तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आषाढी वारीत लाखो भाविक सहभागी होत असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर नजर आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देणे ही पोलिसांसमोरील मोठी आव्हाने असतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, फेस रिकग्निशन तंत्रज्ञान, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली आणि उच्च क्षमतेची सीसीटीव्ही यंत्रणा यांचा समन्वित वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून वारी मार्गावरील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सतत नजर ठेवली जात असून, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने कारवाई करता येत आहे.

भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवून आणत पुणे पोलिसांनी यंदाच्या आषाढी वारीसाठी अत्यंत सक्षम आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारली असून, लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande