
पुणे, 10 जुलै (हिं.स.)।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे गुरुवारी पुण्यात भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे महापालिकेच्या 'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' उपक्रमांतर्गत महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे औक्षण करून पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पालख्यांवर पुष्पवृष्टी करून संतांना अभिवादन करण्यात आले.
महापौर नागपुरे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व भावना जाणून घेतल्या. तसेच वारकरी महिलांसमवेत फुगडी खेळत वारीतील समता, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश दिला. या अनोख्या सहभागामुळे वारकरी आणि उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने वारकरी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन हा प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाचा क्षण आहे. वारकरी बांधवांची सेवा हीच संतसेवा मानून पुणे महापालिकेचे सर्व विभाग 'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' अंतर्गत अहोरात्र कार्यरत आहेत.
स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून, संतांनी दिलेला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु