सोलापुरात जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी; दररोज ४०० प्रस्ताव दाखल
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याने सोलापूर येथील विभागीय जात पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी दररोज सुमारे ४०० प्रस्ताव दाखल होत असून, विद्य
सोलापुरात जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी; दररोज ४०० प्रस्ताव दाखल


सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याने सोलापूर येथील विभागीय जात पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी दररोज सुमारे ४०० प्रस्ताव दाखल होत असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात विविध पदवी, पदव्युत्तर आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणारे विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करत आहेत. विशेषतः बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपासून समितीकडे अर्जांचा ओघ वाढला असून, रोज सुमारे ४०० प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. त्यामुळे कार्यालयात मोठी गर्दी होत असली तरी कामकाज सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.

विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन स्वतंत्र खिडक्यांवर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी आवश्यक कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करूनच प्रस्ताव स्वीकारत आहेत, त्यामुळे त्रुटी असलेले अर्ज तत्काळ दुरुस्त करण्याची सुविधा अर्जदारांना मिळत आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पदवी व पदव्युत्तर तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास शैक्षणिक शुल्कातील सवलतीपासून विद्यार्थी वंचित राहू शकतात. काही प्रकरणांमध्ये प्रवेश खुल्या प्रवर्गात रूपांतरित होण्याची किंवा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून जात पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande