
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ही मतदार पात्रतेसाठी (अहर्ता) कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या मतदारांनाच निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
या कट-ऑफ तारखेच्या आधारे प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात येणार असून, त्या बँकेकडून विभागीय सहनिबंधकांकडे सादर केल्या जातील. त्यानंतर अंतिम मतदार यादी आणि संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी यासंदर्भातील पत्र बँकेचे प्रशासक तथा सहकार विभागाचे पुणे विभागीय निबंधक यांना पाठविले आहे. या पत्रामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ २०१८ मध्ये बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होत असल्याने सहकार क्षेत्रात या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक तातडीने घेण्यात यावी, या मागणीसाठी बावची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १ जुलै रोजी न्यायालयाने प्रशासकांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आठवडाभरात निवडणुकीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच्या सुनावणीची अपेक्षा असताना त्या दिवशी प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. मात्र, निवडणूक प्राधिकरणाने अहर्ता तारीख निश्चित केल्याने निवडणूक प्रक्रियेला आता अधिकृत गती मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड