
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित १ हजार ४७८ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा 'मित्रा'चे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या अंतिम तांत्रिक आराखड्यासह (टीपीआर) निधी आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीला महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी २० जुलैपूर्वी अंतिम तांत्रिक प्रकल्प अहवाल (टीपीआर) शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. टीपीआर मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग देण्यात येणार आहे.
बैठकीत जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रिया यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असून ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाने हा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहराच्या भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड