
मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। प्रपोजलनंतर केदार आणि तारिणीच्या नात्याने आता एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. आपल्या प्रेमाची कबुली देत केदारने तारिणीला मनापासून प्रपोज केल्यानंतर त्यांच्या नात्यातील गोडवा आणखी वाढला आहे. पहिली वटपौर्णिमा, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि आता त्यातच ऋतूतील पहिल्या पावसाची रोमँटिक सर... या सगळ्यामुळे त्यांच्या प्रेमाला आणखी बहर आला आहे. पावसाच्या सरींमध्ये एकमेकांसोबत भिजत, नकळत हसत-खेळत आणि मनमोकळ्या गप्पा मारत केदार-तारिणी प्रेमाचे अविस्मरणीय क्षण अनुभवताना दिसणार आहेत. त्यांच्या या गोड क्षणांमुळे प्रेक्षकांनाही त्यांच्या प्रेमाच्या सुंदर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
या खास रेन सीनबद्दल बोलताना 'तारिणी' म्हणजेच शिवानी सोनार म्हणाली, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी पावसात भिजत असा सीन शूट केला. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. खरं सांगायचं तर माझा वाढदिवसही पावसाळ्यातच असतो, त्यामुळे पावसाशी माझं एक वेगळंच नातं आहे. पण इतकं मनसोक्त पावसात भिजणं बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळालं आणि तेही तारिणी-केदारच्या या सीनमुळे. या सीनमध्ये आमच्यासोबत लहान मुलंही होती. केदार आणि तारिणीच्या प्रेमाला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या नात्याला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे असे रोमँटिक प्रसंग साकारताना आणखी मजा येते. जवळपास तीन तास सतत पावसात शूटिंग सुरू होतं. आम्ही कलाकार म्हणून तर खूप एन्जॉय केलं, पण आमचे तंत्रज्ञ, दिग्दर्शन टीम आणि इतर क्रू सदस्यांनी रेनकोट घालून खूप मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीमुळेच हा प्रसंग इतका सुंदर साकारता आला. शूटिंगदरम्यान रस्त्यावरचे लोकही आमचं शूटिंग पाहून आनंद घेत होते. आता प्रेक्षकांनाही हा एपिसोड तितकाच आवडेल, याची मला खात्री आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका 'तारिणी', दररोज रात्री ९.०० वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर