उजनी ३५.९३ टक्के भरले; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी
सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, भीमा नदीवरील वीर धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. उजनी धरण ३५.९३ टक्के भरले असून, धरणाची
ujani dam news


सोलापूर, 10 जुलै (हिं.स.)। सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, भीमा नदीवरील वीर धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

उजनी धरण ३५.९३ टक्के भरले असून, धरणाची एकूण संचय क्षमता ८२.९० टीएमसी आहे. सध्या धरणात उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा १९.२५ टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा सोलापूर जिल्ह्यात मान्सूनला दीड महिना उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पेरण्या रखडल्या असून केळी, डाळिंब, द्राक्ष, ऊस आणि अन्य पिकांनाही पाण्याअभावी फटका बसत आहे. मात्र, पुणे घाटमाथा आणि इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे.

उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात काहीशी घट झाली असली तरी आवक अद्याप कायम आहे. बुधवारी सायंकाळी १ लाख १७ हजार ६४२ क्युसेक इतका असलेला प्रवाह गुरुवारी सायंकाळी ६८ हजार ३०३ क्युसेक इतका नोंदविण्यात आला.

तज्ज्ञांच्या मते, आणखी दोन दिवस अशीच पाण्याची आवक कायम राहिल्यास उजनी धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच आगामी काळात शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande